जसा महाराष्ट्राचा आंबाधर्म म्हणजे हापूस, गोव्याचा माणकुराद, लखनऊ चा दशेरी, तसा गुजरातचा आंबाधर्म म्हणजे केशर! "आखूडशिंगी, बहुदुधी' ह्या कॅटेगरीतला. अंगाने चांगला भरलेला आणि सुदृढ असलेला केशर हा गुजरातचा आत्मा आहे. गुजराती बांधवांना त्याचा सार्थ आणि जाज्वल्य असा अभिमानही आहे! ह्या लॉकडाउन च्या बिकट दिवसांमध्येही तोंडाला मास्क लावून, डोक्यावर छत्री घेउन भर उन्हात घराघरातील माऊल्या सोशल डिस्टंसिंग पाळत केशराच्या आराधनेत मग्न होत्या. शेवटी, राज्य सरकारने कंटाळून एका मोठ्या मैदानात पंधरा दिवसांसाठी आंबा मेळावा भरवला. प्रजेने यथेछ आंबा खाल्ला. कोरोना की ऐसी तैसी..
'तलाला' ह्या गीर जवळच्या गावचा केशर सगळ्यात उत्कृष्ट प्रतीचा मानला जातो. एका किलोत जेमतेम ३ आंबे बसतील एवढा वजनदार. पूर्ण पिकलेला केशर आतून गर्द केशरी असतो. पातळ साल, मगजदार फळ, बारकीशी कोय आणि अवर्णनीय मधुर चव! रेषा नसलेला गर हे आणखी एक वैशिष्ट्य. त्यामुळे हा आंबा कापून खाल्ला किंवा रस काढून खाल्ला तरी त्याची मजा सारखीच! फळांचा राजा आंबा, पण त्यांतला सगळ्यात सर्वगुणसंपन्न राजा म्हणजे 'केशर'! ह्या वर्षी लॉकडाऊन मुळे अंमळ उशिरा घरी आला..

👍👍
ReplyDelete